We wander therefore we are ... We wonder!

IndiaLadakhMarathi

पॅंगॉंगची निळाई

लेहला पोचल्यावर एक दिवस सक्तीची विश्रांती घेतली. दुस-या दिवशी लेहच्या जवळचे बौद्ध मठ - राजवाडा बघुन आलो.
तिस-या दिवशी लेहच्या उंचीवरच्या वातावरणाची सवय झाली होती. तेंव्हा अधिक उंचीवर चढाई करायचे ठरवले. पॅंगॉंग लेक पहायला निघायचे ठरवले. तिथे पोचायला आम्हाला चीन सीमेकडे निघायचे होते. छांगला हा १७५८६ मी उंचीची खिंड पार करायची होती. अंतर जवळ जवळ १५० किमी. आहे.

काल ओळखीच्या झालेल्या रस्त्याने कारुच्या लष्करी तळापर्यंत सोबत केली. तिथुन छांग-लासाठी वळलो. पुढचा रस्ता पुर्ण वेळ पहाडांच्या अंगाखांद्यावरुन जाणारा. हे छाती दडपुन टाकणारे, हिरवाईच्या नरमाईचा मागमुस नसलेले पहाड. त्याच्या कडेवर झेड आकारात - कोरलेले रस्ते. हिमालयाच्या पहाडाची वेगळी त-हा असते. आपल्या सह्याद्रीसारखा नुसताच कातळ नाही. अंगाखांद्यावर भरपुर पथ्थर-दगड-गोटे बाळगुन असलेला.लदाखमध्ये तर त्याला धरुन ठेवायला जंगलांचाही आधार नाही. त्यात बर्फानी होणा-या धुपीची भर. मुलखाचा लहरी आणि बेभरवशाचा. अंगावर कोरलेल्या रस्त्यांना अजिबात न जुमानणारा. दरडी - दगड कोसळवुन रस्त्याला पार होत्याचं नव्हतं करणारा. तरी चिवट माणसं ते रस्ते परत परत कोरतात.

असंच एक वळण काढुन पुढे जात असताना, आले की दोन - चार दगड घरंगळत. आता जीप पुढे जाणे शक्य नव्हते. आमचे वीर उतरुन दगड बाजुला करु गेले तर जे घरी सहज एकाला जमले असते ते करता करता तिघांची दमछाक झाली इथे.
असा रस्ता काटत आम्ही छांग-ला पर्यंत पोहोचलो. इथे पोचेपर्यंत वाटेत बर्फ सुरु झाले. छांग - ला १७,५८६ मी उंचीवर आहे. तिथे छांग बाबांचे देउळ पण आहे.



तिथुन मग परत उतार सुरु. प्रत्येक वळणावर पहाडाचा नवा आविष्कार. रंगांची आकारांची उधळण. लडाख च्या लॅडस्केप्च प्रथम पोचलो दारबुख ला. इथे चेकपोस्ट आहे. इथुन हिमालयन मॉरमॉट्स दिसायला सुरवात होते. तिथुन उतरलो चांग थांग वॅलीत. ही चुशुल लोकांची भुमी आणि चुशुल वॉरियर्स या रेजिमेंट चे घर. तिथे तांग्त्से ला थांबलो. इथे रानडे बंधुंनी पराठ्याच्या डब्याबरोबर कुस्ती केली आणि शेवटी ड्रायवर जिंकला.


इथुन पुढे मॉरमॉट्स, याक, पश्मीना लोकर देणा-या मेंढ्या, जंगली गधे अशी प्राणी सृष्टी निरखत आमचा प्रवास सुरु झाला. वाटेतल्या पगला नाला ला वेड लागायच्या आत तो आम्ही पार केला. एके ठिकाणी चढावर रस्ता पार वाहुन गेलेला. आणि चढावर नुसतेच दगड धोंडे. त्यातुन घसरणारी गाडी बघुन आमच्या मंडळीत घबराट. पण ’सियावर रामचंद्र..’ च्या गजरात तो रस्ता पार केला आणि आम्हाला पॅंगॉंगचे पहिले दर्शन घडले.



त्यानंतर डोळ्यात भरुन राहिला नुस्ता पॅंगॉंग! अफाट १८० किमी पसरलेला. विविध रंगी पहाडांनी वेढलेला, अथांग. सुर्यप्रकाशाबरोबर खेळणारा, रंग बदलणारा जादुगार.






आणि संध्याकाळी तर जणु खास मैफल. रत्नकीळ नीलकांत पँगॉंग, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशा मोरपीसाच्या सगळ्या छटा ल्यायलेल्या -आणि भोवतालच्या रंगबाव-या, आकाशातल्या ढगांशी छायाप्रकाशाचे, रंगांचे खेळ खेळणारे पहाड. ते सर्व दृष्य केवळ अवर्णनीय होते.






रात्री आम्ही तेथे वस्ती केल्याने आम्हाला हे अनुभवता आले. डोळ्याचे पारणे फिटले. लडाख मध्ये प्रार्थना म्हणुन दगडांची उतरंड रचतात. पॅंगॉंगला मी ही एक उतरंड रचली - त्या अनोख्या सृष्टीकर्त्यापुढे नतमस्तक होऊन. त्याचंच घेउन त्याच्याचसाठी...

No comments:

| Designed by Colorlib