We wander therefore we are ... We wonder!

IndiaMahabaleshwarMaharashtraMarathi

पुनश्च महाबळेश्वर

या वर्षी आमची पावसाळी महाबळेश्वर वारी गणपतीत घडली. हो, आम्ही वर्षात दोनदा तरी महाबळेश्वरी जातो. पावसाळ्यात आणि स्ट्रॉबेरी च्या हंगामात. तर या वेळी गणपतीच्या सहाव्या किंवा सातव्या दिवशी आम्ही तिथे होतो. मार्केट रोडवरुन विसर्जनाच्या मिरवणुकी चालल्या होत्या. त्यांचा तो लक्ष्मी रोड आहे ना! मजा वाटली, महाबळेश्वरात गणपती बसत असतील, विसर्जनाच्या मिरवणुकी असतील असं कधी डोक्यातच आलं नाही!


थंडीतलं महाबळेश्वर कसं खास 'लोकाग्रहास्तव' असतं. पाहुण्यांसमोर शहाण्यासारख्या वागणा-या मुलासारखं. उन्हाळ्यात ते भडक गुज्जु असतं वेण्णा लेकवर नवीन उपटलेल्या चौपाटीसारखं. पावसाळ्यात मात्र ते फक्त स्वत:चं असतं. सगळ्या स्थिर, चर, वस्तुमात्रांवर हिरव्याचं आक्रमण झालेलं असतं. दगड, रस्ते, झाडे, भिंती, छपरं, माणसं, सगळं दमट आणि हिरवं. trees2.jpg


पावसाळ्यातल्या महाबळेश्वरला एक स्वभाव आहे. गुढ भासतं ते या काळात. सगळ्या आसमंताला गुरफटुन टाकणारी ढगाची घोंगडी, लहरी पाउस, शेवाळाच्या झिप-या पिंजारलेली निष्पर्ण झाडं. महाबळेश्वर मोठं 'ऍटमॉस्फेरीक' असतं. ग्रेसच्या कवितेसारखं रहस्यमय, आकर्षित करणारं, स्वयंमग्न आणि लिरिकल!


landscape.jpg

No comments:

| Designed by Colorlib